लोकप्रिय मराठी ब्रेकिंग न्यूज: बुलढाणा हादरले! प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: शहरातील एका नामांकित (कलंकित) आणि प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या विकृत कृत्याने संपूर्ण बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील जयस्तंभ चौकातील प्रसिद्ध घड्याळ व्यावसायिक यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी यांच्या राहत्या घरी गेली होती. यावेळी आरोपी यांनी त्या मुलीचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. “वाईट नजरेने शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपी यांनी केले,” अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस कारवाई आणि ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. आरोपी यांच्या विरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यासह विनयभंगाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या पोलीस ठाण्यात युद्धपातळीवर सुरू आहे. एका प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व्यापाऱ्याचे असे घृणास्पद रूप समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.




