अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक: ‘संस्थानिक’ आणि ‘पैठणी-पाकिटे’ संस्कृतीविरुद्ध शिक्षक भारतीने दंड धोपटले; चुरस शिगेला… शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांची प्रचारात मोठी आघाडी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले आहे. महायुतीचे किरण सरनाईक,काँग्रेसचे आदिती पोहरे यांच्यासह शिक्षक भारतीचे सुरेश देवकर,उबाठा शिवसेनेचे दत्तात्रय लहाने आणि इतर अपक्ष रिंगणात असल्याने यंदाची लढत अटीतटीची ठरत आहे. सत्ता, संपत्ती आणि संस्थानिकांच्या विरोधात शिक्षकांची एकजूट निर्माण करण्यासाठी शिक्षक भारतीने पूर्ण ताकद पणाला लावली असून मतदारांमध्येही सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि महायुतीची संपूर्ण फौज मैदानात उतरली असली, तरी गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात ‘जुनी पेन्शन’सारख्या कळीच्या मुद्द्यावर काहीही ठोस निर्णय न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. संस्थाचालकांचे पाठबळ आणि प्रचारात दिल्या जाणाऱ्या कथित ‘भेटी’ (पैठणी-पाकिटे) यांच्या जोरावर ही लढत जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. “सत्ता असूनही कामे न झाल्यानेच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनांचा आधार घ्यावा लागत आहे,” अशी उघड चर्चा सामान्य शिक्षकांमध्ये रंगली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात डमी उमेदवार उभे करून मतांचे विभाजन करण्याचा डाव आखल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार आदिती पोहरे यांच्या राजकीय प्रवेशावरून आणि घराणेशाहीवरून टीका सुरू झाली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद आणि काँग्रेसमधील राजकीय लागेबांध्यांमुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. “शिक्षकांना पेन्शन मिळाली नाही तर मी आमदारकीची पेन्शन घेणार नाही,” हे त्यांचे आश्वासन दिशाभूल करणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आजवर शिक्षकांच्या वेतनाचा आणि पेन्शनचा प्रश्न न मांडणारे आता सत्तेत नसताना पेन्शन कशी मिळवून देणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. विद्यमान आमदारांविरोधातील लाटेचा फायदा घेऊन सहज विजय मिळेल, हा पोहरे यांचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, अशी चर्चा शिक्षक वर्तुळात आहे.

-​कपिल पाटलांच्या झंझावाती प्रचारामुळे देवकरांचे पारडे जड-

या पार्श्वभूमीवर, शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. माजी आमदार कपिल पाटील यांच्या अठरा वर्षांच्या बेधडक आणि प्रामाणिक लढ्याची पार्श्वभूमी देवकरांच्या पाठीशी असल्याने अमरावती मतदारसंघाच्या संपूर्ण जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमध्ये शिक्षक भारतीचे कार्यकर्ते एकवटले आहेत. जुनी पेन्शन, कंत्राटी व अंशकालीन शिक्षकांचे प्रश्न आणि तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षक भारती हाच एकमेव सक्षम पर्याय असल्याचा दावा केला जात आहे.

-​संस्थानिकांच्या वर्चस्वाविरोधात एकजुटीचे आवाहन-

दिलीप कडू, प्रशांत विघे आणि दत्तात्रय लहाने या अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात जोरदार उपस्थिती दर्शवली आहे. मात्र, संस्थानिक आणि धनदांडग्या उमेदवारांचा पराभव करायचा असेल, तर शिक्षकांनी मतांचे विभाजन टाळले पाहिजे, असे आवाहन शिक्षक भारतीकडून करण्यात येत आहे. ही निवडणूक केवळ आमदारकीची नसून शिक्षकांच्या भविष्याची, स्वाभिमानाची आणि संस्थाचालकांच्या दबावातून मुक्त होण्याची लढाई असल्याचे वातावरण मतदारसंघात निर्माण झाले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!