दहावी-बारावीच्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ; विद्यार्थ्यांकडून ‘फी’ आकारल्यास शाळांवर कडक कारवाईचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा

- लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर थेट प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा बुलढाण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी दिला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने बाधित तालुक्यांमध्ये अनेक सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या १० वी व १२ वी परीक्षा शुल्कमाफीचा महत्त्वपूर्ण समावेश आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांच्या स्वाक्षरीने २९ सप्टेंबर रोजी अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, विभागीय मंडळांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी प्रविष्ट होणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेताना पुढील आदेशापर्यंत एकही रुपया परीक्षा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश मंडळाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या निर्णयाची लेखी माहिती देण्यात आली असून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी लोकप्रिय मराठी न्युज ला दिली आहे.
दरम्यान शासनाच्या दुष्काळ सवलत योजनेनुसार दुष्काळग्रस्त भागातील कोणत्याही दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्याकडून शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क वसूल करू नये. जर एखाद्या संस्थेने नियम डावलून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याचे आढळल्यास त्या शाळेवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल.असा इशारा बुलढाणा माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी दिला आहेत.




