जागतिक प्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठी रंगणार ‘योग महोत्सव’; ७ एप्रिलला भव्य आयोजन

​७ हजार योगसाधकांचा सहभाग लाभणार; 'एशियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्याचा मानस - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता अवघे ७५ दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिल रोजी जागतिक प्रसिद्ध लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात भव्य ‘योग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

​लोणारमध्ये होणार विश्वविक्रम! या योग महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी ‘त्रिकोणासन’ करण्याचा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केला जाणार असून, यात ७ हजारांहून अधिक योगसाधक सहभागी होणार असल्याची माहिती ना. प्रतापराव जाधव यांनी दिली.

​पंतप्रधानांच्या संकल्पनेतून योगविद्येला जागतिक मान्यता पत्रकार परिषदेत बोलताना ना. जाधव म्हणाले की, “योगसाधना ही भारतीय संस्कृतीची प्राचीन आणि महान परंपरा आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा सुसंवाद साधणारी ही एक जीवनशैली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडलेल्या प्रस्तावामुळे २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जगभर साजरा होऊ लागला आहे. येत्या २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून, त्यापूर्वीच्या १०० दिवसांच्या ‘काऊंटडाऊन’ कार्यक्रमातील ७५ दिवसांचा टप्पा लोणारमध्ये साजरा होत आहे.”

​विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या महोत्सवात इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिविंग यांसारख्या नामवंत संस्थांसह लोणारमधील महिला बचत गट, शालेय विद्यार्थी आणि आयुष संस्थेचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील पहिल्या कार्यक्रमानंतरचा हा दुसरा मोठा टप्पा बुलढाणा जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.

​या पत्रकार परिषदेला मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानचे निदेशक डॉ. काशिनाथ समघंडी आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय पातळीवर या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून लोणार नगरी योगमय होण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!