बुलढाण्याच्या धाड मध्ये अन्नातून विषबाधा; दोन चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत
आईसह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक; धाड येथील जमदार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: चिखली तालुक्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला असून, आईसह दोन मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. वरण-भात खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाड येथील जमदार कुटुंबातील सदस्यांना परवापासून अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. घरातील अन्नातून ही विषबाधा झाल्याचे समजते. उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने रुग्णालयात त्यांचे दुर्दैवाने उपचारादरम्यान दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
चिमुकल्यांच्या मृत्यूने धाड गावावर शोककळा या घटनेत मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्ष) आणि मशीरा मोहंमद जमदार (वय ७ वर्ष) या दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. एकाच वेळी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या कुटुंबातील आई आणि इतर दोन मुलींची प्रकृती देखील खालावली असून त्यांना सध्या बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघींची प्रकृती सध्या अत्यवस्थ असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
विषबाधेचे कारण अस्पष्ट जमदार कुटुंबाने परवा जेवणात ‘वरण-भात’ खाल्ला होता, त्यानंतरच हा त्रास सुरू झाल्याने त्याच अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण काय? अन्नात काही पडले होते का? किंवा इतर काही तांत्रिक कारण आहे का? याचा तपास सुरू आहे.




