बुलढाण्याचे तत्कालीन व अमळनेरचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत सक्तीच्या रजेवर; अधिवेशनात आमदार अनिल पाटील यांच्या प्रश्नानंतर शासनाची मोठी कारवाई

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
अमळनेर / बुलढाणा: सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन बुलढाणा आणि सध्याचे अमळनेर येथील कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांना अखेर महाराष्ट्र शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित व लक्षवेधी प्रश्नानंतर शासनाचे अवर सचिव द. व. खारके यांनी या कारवाईचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या मनमानी कारभारामुळे, दबावतंत्रामुळे आणि मानसिक त्रासामुळे अमळनेर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या २४ एप्रिल २०२६ रोजी सामूहिक बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. राऊत हे मार्च २०२५ पासून अमळनेर येथे कार्यरत आहेत. मात्र, ते मुख्यालयी न राहता जळगाव येथून ये-जा करत होते, ज्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शिवाय सुभाष राऊत यांच्यावर आणखीही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अमळनेर येथे शासकीय निवासस्थान उपलब्ध असूनही त्याचा वापर न करता त्यांनी नियमबाह्य पद्धतीने घरभाडे भत्ता (HRA) लाटल्याचे त्यांच्यावर आरोप करत ते जळगाव ते अमळनेर अशा प्रवासासाठी शासकीय वाहनाचा अनिबंध वापर करून शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
-आमदार अनिल पाटील यांची विधानसभेत आक्रमक भूमिका-
या गंभीर प्रकरणाची दखल घेत अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शासनाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर शासनाने ८ जून २०२६ रोजी नाशिक प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना १८ अभियंत्यांचे जबाब नोंदवून आणि राऊत यांचा खुलासा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल आणि कठोर चौकशी व्हावी, तसेच दोषी अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीची कारवाई व्हावी, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली.
आमदारांच्या या लक्षवेधी प्रश्नानंतर शासनाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




