झारखंडमध्ये बुलढाणा ‘एलसीबी’ पथकावर जमावाचा जीवघेणा हल्ला; तीन पोलीस जखमी ; पोलिसांकडून मात्र घटनेवर पडदा टाकण्याचा संशयास्पद प्रयत्न!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: नांदूरा तालुक्यातील काटी येथील वृद्ध रायसिंग सोळंकी यांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी झारखंडमध्ये गेलेल्या बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकावर आरोपींच्या जमावाने तुफान हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी पोलिसांचे दागिने व मोबाईलही लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खाकी वर्दीवर झालेला हा जीवघेणा हल्ला आणि लुटालूट होऊन आठवडा उलटला तरी बुलढाणा पोलिसांनी या गंभीर घटनेवर पूर्णपणे पडदा टाकून संशयास्पद गोपनीयता बाळगली आहे. स्वतःच्याच कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) नोंदवून तो संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याची साधी तसदीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का घेतली नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काटी येथील दरोडा आणि खून प्रकरणातील आरोपींचा माग काढण्यासाठी LCB चे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड आणि अविनाश जायभाये यांच्या नेतृत्वाखालील पथक झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले होते.या पथकांमध्ये पोहेंका युवराज राठोड, गणेश पाटील,पुरुषोत्तम आघाव पोका गजानन गोरले,हेका निलेश राजपूत आदींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हंसडिया पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असताना आरोपींच्या फासे फारधी जमावाने बुलढाणा पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम आघाव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश राजपूत यांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाच्या गळ्यातील चांदीच्या चेनी हिसकावून घेतली तसेच एका कर्मचारीचा मोबाईलही फोडून टाकले.

गुन्हा दाखल न करता लपवाछपवी कशासाठी?

एकीकडे पोलिसांवर हल्ला करून लुटालूट होत असताना, पोलीस पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. मात्र, २० ते २३ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या भयंकर हल्ल्याबाबत अद्यापही हल्लेखोरांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. नियमानुसार, कर्तव्यावर असताना पोलिसांवर हल्ला झाल्यास बुलढाण्यात तात्काळ गुन्हा नोंदवून तो ‘झिरो’ क्रमांकाने झारखंड पोलिसांकडे वर्ग करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक होते.

​परंतु, स्वतःच्याच खात्याची नाचक्की लपवण्यासाठी आणि वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी या संपूर्ण प्रकरणावर पांघरूण घालण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांवरच असा हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवत नसेल, तर बुलढाणा पोलीस दलाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!