BREAKING NEWS: खामगावच्या उच्चभ्रू आदर्श नगरात भररात्री बंद घरात चोरी; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद; नांदुरा, पळशी झाशीनंतर आता खामगावात थरार; वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

- लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथील दरोडा,हत्या आणि पळशी झाशी (तामगाव) येथील चोरीचा तपास सुरू असतानाच, आता खामगाव शहरातील उच्चभ्रू परिसर मानल्या जाणाऱ्या आदर्श नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री तब्बल दोन तास धुमाकूळ घातला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र घबराट पसरली आहे.
आदर्श नगर येथील रहिवासी जसवंत चव्हाण हे कुटुंबासह कामानिमित्त पुण्याला गेलेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत तीन चोरट्यांनी मध्यरात्री घराचे तब्बल तीन दरवाजे तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी संपूर्ण घराची नासधूस करत वस्तूंची फेकाफेक केली. चव्हाण कुटुंब शहराबाहेर असल्याने चोरीस गेलेल्या मुद्देमालाची आणि रोख रकमेची नेमकी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
चोरट्यांनी हालचाल सीसीटीव्हीत कैद
चोरट्यांनी परिसरात जवळपास दोन तास ठाण मांडून उच्छाद मांडला होता. या संपूर्ण घटनेदरम्यान तिन्ही चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलीस आता या फुटेजच्या आधारे त्यांचा माग काढत आहेत.
पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र संताप
काही दिवसांपूर्वीच नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोडेखोरांनी एका व्यक्तीची निर्घृण हत्या केली होती. त्यापाठोपाठ तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी झाशी येथे चोरीची घटना घडली. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा छडा लागण्यापूर्वीच खामगाव शहरात थेट उच्चभ्रू वस्तीत चोरट्यांनी चोरी केल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या गस्त आणि कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.




