बुलढाणा पोलीस मुख्यालयातील डिझेल जनरेटर परस्पर विकले? शहर पोलिसांच्या डीबी पथकाकडून जनरेटर जप्त; पोलीस दलात खळबळ; आरपीआय तिडकेंची उडवा-उडवीचे उत्तरे

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जिल्हा पोलीस मुख्यालयातील जुना मोठा विद्युत डिझेल जनरेटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता परस्पर भंगार व्यावसायिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शहरातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्यांकडून डिझेल जनरेटर जप्त केला आहे. मात्र, जप्त करण्यात आलेला जनरेटर पोलीस मुख्यालयाचाच आहे किंवा नाही, याबाबत अद्याप शहर पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सूत्रांकडून ​मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा पोलीस मुख्यालयातून सुमारे दोन महिन्यांपूर्वी एक जुना मोठा विद्युत डिझेल जनरेटर शासकीय नियमांना बगल देत परस्पर भंगार खरेदी करणाऱ्याला विकण्यात आला होता. मुख्यालयात सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारनाम्याची माहिती गृह पोलीस उपअधीक्षक बी. डी. पावरा यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण प्रकरणाचा गोपनीय अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांना सादर केला.

​पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर बुलढाणा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तत्काळ तपासचक्रे फिरवत शहरातील एका जुन्या इमारती तोडणाऱ्या व शासकीय कार्यालयांतील भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाकडून हा डिझेल जनरेटर जप्त केला.

-आरपीआय विकास तिडकेंची उडवाउडवीची उत्तरे-

पोलीस मुख्यालयातील जुने साहित्य आणि भंगाराची जबाबदारी राखीव पोलीस निरीक्षक (RPI) विकास तिडके यांच्याकडे आहे. मुख्यालयातील साहित्याची परस्पर विक्री किंवा अफरातफर झाल्यास त्याची थेट जबाबदारी त्यांच्यावर येते. जप्त करण्यात आलेला जनरेटर व या विक्री प्रकरणाबाबत विकास तिडके यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली.

-​बेड, खुर्च्या आणि सिलिंडरही परस्पर विकल्याची चर्चा-

केवळ जनरेटरच नव्हे, तर पोलीस मुख्यालयातील जुने लोखंडी बेड, जुन्या खुर्च्या आणि सिलिंडर देखील अशाच प्रकारे बेकायदेशीररीत्या हजारों रुपयात परस्पर विकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रक्षकांकडूनच शासकीय साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने पोलीस दलाच्या वर्तुळात तीव्र चर्चा रंगली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!