एकनाथ शिंदेंवर आरोप करणं म्हणजे ‘बेशरमाचं’ लक्षण! आ. संजय गायकवाडांचा अंजली दमानियांवर घणाघाती हल्ला

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना बुलढाण्याचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. “एकनाथ शिंदेंवर आरोप करणे हे बेशरमाचे लक्षण असून, टिवटिव करणाऱ्यांनी घाणेरडे राजकारण करू नये,” अशा शब्दांत गायकवाडांनी दमानियांवर हल्लाबोल केला आहे.
अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की, भोंदूबाबा अशोक खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १७ वेळा फोनवरून संभाषण झाले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांच्याशीही १७७ वेळा संवाद झाल्याचा आरोप त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी होते? असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केल्याने खळबळ उडाली होती.
दमानियांच्या या आरोपांवर आमदार संजय गायकवाड चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आपला देश हा हिंदू धर्मीयांचा आणि देवी-देवतांना मानणारा देश आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत कोणी फोटो काढला किंवा कुणी कॉल केला याचा अर्थ असा होत नाही की त्यांना त्या भोंदू बाबाच्या पोटात काय आहे हे माहित होतं.”
गायकवाड यांनी टीका करताना अत्यंत धारदार शब्द वापरले. ते म्हणाले, “या ज्या काही दोन-तीन बाया विनाकारण टिवटिव करतात, त्यांनी हे घाणेरडे राजकारण थांबवावे. राजकीय लोकांवर चिखलफेक करून स्वतः मोठे होण्याचा धंदा या महिलांनी आता सोडला पाहिजे. त्या भोंदू बाबाने जे काही चुकीचे कृत्य केले असेल, ते बाहेर काढलेच पाहिजे आणि त्या पवित्र कामात आम्हीही सोबत असू. मात्र, विनाकारण सन्माननीय व्यक्तींना यात ओढणे चुकीचे आहे.या प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत असून नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाला आता पूर्णपणे राजकीय वळण लागले आहे.




