आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत बुलढाणा नगर परिषदेची विशेष सभा; विकासकामांचा घेतला ‘मॅरेथॉन’ आढावा
आरोग्य कर्मचाऱ्यांना जॅकेट वाटप; शहरातील मूलभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर भर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: चंदीगड येथे उपचार घेऊन परतल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय (संजुभाऊ) गायकवाड यांनी शहराच्या विकासासाठी कंबर कसली आहे. शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची विशेष सभा व सर्व विभागांची मॅरेथॉन आढावा बैठक वारकरी भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत शहराच्या आगामी विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विभागांचा सविस्तर आढावा
या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, कर (टॅक्स), विद्युत आणि बांधकाम अशा सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विकासकामांबाबत आमदारांनी थेट अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामात गती आणि पारदर्शकता आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान
नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून आणि आमदार गायकवाड यांच्या हस्ते नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘ऍप्रॉन’ (जॅकेट) वाटप करण्यात आले. शहराची स्वच्छता राखणाऱ्या हातांचा हा सन्मान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक सूचना
“नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही अडचण येता कामा नये. प्रशासनाने जनतेप्रती उत्तरदायी राहून काम करावे,” अशा सूचना आमदार गायकवाड यांनी दिल्या. शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रत्येक विभागाला कार्ययोजना आखून दिली.
पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या विशेष सभेला मुख्याधिकारी गणेश पांडे, युवानेते मृत्युंजय गायकवाड, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्यासह बांधकाम सभापती पुष्पाताई धुड, आरोग्य सभापती ईशरत परवीन, महिला व बालकल्याण सभापती इंदुताई घट्टे, शिक्षण सभापती दीपक सोनुने, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा तसेच नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विकासाला लाभली नवी दिशा
आमदार संजय गायकवाड यांच्या पुनरागमनानंतर पार पडलेल्या या पहिल्याच मोठ्या बैठकीमुळे शहर प्रशासनात चैतन्य पसरले आहे. आगामी काळात बुलढाणा शहराचा चेहरामोहरा बदलणारे मोठे प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास या सभेतून व्यक्त करण्यात आला.




