BREAKING NEWS: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळफेक; घाटाखालच्या निरीक्षकाची ‘मेहेरबानी’ चव्हाट्यावर! हद्दीत सुरू केले ५ ते ६ जुगार अड्डे; ‘पार्टनरशिप’च्या वादातून फुटले बिंग

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा:
एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘नो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारले असताना, दुसरीकडे त्यांच्याच एका ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षकाने त्यांची दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या पोलीस निरीक्षकाने आर्थिक लाभापोटी आपल्या हद्दीत चक्क ५ ते ६ बेकायदेशीर जुगार अड्डे सुरू केल्याची चर्चा आता पोलीस वर्तुळात रंगली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी निलेश तांबे रुजू झाल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. “ज्यांच्या हद्दीत अवैध धंदे मिळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला आहे. मात्र, बुलढाण्यापासून काही अंतरावर असलेल्या घाटाखालील एका पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाने या आदेशांना केराची टोपली दाखवली. जिल्हा प्रमुखांना कोणतीही भणक लागू न देता, आर्थिक ‘मेहेरबानी’ स्वीकारून हे अड्डे राजरोसपणे सुरू करण्यात आले होते.
पार्टनरशिपचा वाद आणि बिंग फुटले
या सर्व बेकायदेशीर व्यवहाराचे बिंग एका अंतर्गत वादामुळे फुटले. एका जुगार अड्ड्यावर भागीदारी (पार्टनरशिप) वरून वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका मध्यस्थालाच तिथे मारहाण झाली. या मारहाणीनंतर तक्रारदाराने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. हे प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्याकडे तपासासाठी गेल्यावर सत्य समोर आले. तक्रारीत जरी घटनेचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न झाला असला, तरी घटनास्थळ तेच होते जिथे जुगार अड्डा सुरू होता.
लोकप्रिय मराठी न्यूजच्या प्रश्नानंतर चक्रे फिरली
या प्रकरणाची माहिती ‘लोकप्रिय मराठी न्यूज’ला मिळताच, संबंधित पोलीस निरीक्षकांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी असे काहीच नसल्याचा दावा केला, मात्र प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून सोमवारी रात्रीपासून घाईघाईने सर्व जुगार अड्डे बंद करण्यात आले.
आता लक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे
ज्या पोलीस निरीक्षकाने आपल्या प्रमुखांची दिशाभूल करून अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आपल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैध धंदेवाल्यांशी हातमिळवणी करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




