जिल्हा रुग्णालयातून पसार झालेला आरोपी भावासह जेरबंद; बुलढाणा LCB पोलिसांची भुसावळ येथे धडक कारवाई

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला असताना पोलिसांच्या कस्टडीतून पसार झालेल्या आरोपीला आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सख्ख्या भावाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिपनगर, भुसावळ (जि. जळगाव) येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण व पोलीस पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक पल्सर मोटारसायकल व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

​एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील (अप. क्र. १०९/२०२६, कलम ३०३(२), ३(५) बीएनएस) आरोपी प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २०) आणि कपूरसिंग सुरजसिंग बावरी (वय २५, दोन्ही रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) यांना वैद्यकीय तपासणीसाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री सुमारे ३:०० वाजेच्या सुमारास आरोपी प्रतापसिंग बावरी हा रुग्णालयातील टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (अप. क्र. ८४९/२०२६, कलम २६२ बीएनएस).

​आरोपी पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस दल सतर्क झाले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) पीयुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने शोधपथके रवाना करण्यात आली.

​तपास सुरू असताना, फरार आरोपीला त्याचा सख्खा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी (वय १९) हा लपण्यासाठी मदत करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ जळगाव जिल्ह्यातील दिपनगर (भुसावळ) येथे सापळा रचला. तेथून प्रतापसिंग बावरी आणि त्याला मदत करणारा भाऊ तुफानसिंग बावरी या दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

​दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी दसरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश जयभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, चांद शेख, विजय पैठणे, गणेश पाटील, गजानन गोरले, निलेश राजपूत तसेच तांत्रिक शाखेचे (TAW) राजू आडवे आणि कैलास ठोंबरे यांच्या पथकाने केली.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!