चौथ्या राष्ट्रीय ‘गो’ स्पर्धेची उत्साहात सांगता; आंध्र प्रदेश अव्वल, तर महाराष्ट्र उपविजेता;विजेत्या खेळाडूंची चीनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
शिर्डी: इंडो ॲमॅच्युअर गो असोसिएशन आणि गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चौथी राष्ट्रीय गो चॅम्पियनशिप २०२६-२७’ येथील श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील १८ राज्यांमधून आलेल्या सुमारे ३०० खेळाडूंनी या तीन दिवसीय स्पर्धेत बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. अटीतटीच्या लढतींनंतर आंध्र प्रदेश संघाने सर्वाधिक पदके जिंकत सर्वसाधारण विजेतेपद (ओव्हरऑल चॅम्पियनशिप) पटकावले, तर यजमान महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनियर, सब-ज्युनियर आणि सिनियर अशा तीनही गटांत चुरशीचे सामने रंगले. अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची लवकरच चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘गो’ अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली असल्याची घोषणा आयोजकांनी केली.
स्पर्धेच्या सांगता व बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी इंडो ॲमॅच्युअर गो असोसिएशनचे प्रशासकीय सचिव चंदन पांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास व्यासपीठावर नाशिक विभागीय तांत्रिक अधिकारी गजानन टेकाडे, गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव अनिल सहारे, साईबाबा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष औताडे, कार्यकारी सदस्य डॉ. कुमार, फकीरचंद लोढा, डॉ. हाशिम (केरळ), गुलाम फिरोज (तेलंगणा), प्रसाद (आंध्र प्रदेश), मनोज बजाज (मध्य प्रदेश), चुनाराम (हरियाणा), अनिमेष (उत्तर प्रदेश), राजशेखरन (पुडुचेरी), राजा (तामिळनाडू) आदी विविध राज्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुकुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल सहारे यांनी मानले.



