संजय गायकवाड हे ‘महाराष्ट्राचे जेम्स लेन’; वंचितची खरमरीत टीका

बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे सामूहिक वाचन; 'ऑडिओ क्लिप' प्रकरणावरून जिल्हाध्यक्ष निलेश जाधव आक्रमक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील कथित ‘ऑडिओ क्लिप’ प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली असून, आमदार संजय गायकवाड यांची तुलना थेट ‘जेम्स लेन’शी करत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “संजय गायकवाड हे महाराष्ट्राचे जेम्स लेन आहेत,” अशा शब्दांत वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.

​आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाण्यातील ऐतिहासिक संगम चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर “शिवाजी कोण होता?” या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो” यासह अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

गायकवाड सामाजिक तेढ निर्माण करतायत: निलेश जाधव

​आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश जाधव म्हणाले की, “ज्याप्रमाणे जेम्स लेनने महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करून समाजात विष कालवण्याचे काम केले, तसेच काम सध्या आमदार संजय गायकवाड करत आहेत. स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्या आमदारांची भाषा अशोभनीय आहे. राजकीय फायद्यासाठी महापुरुषांचा अपमान आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा नेत्यांना जनता धडा शिकवेल.”

राजकीय वातावरण तापले

​ऑडिओ क्लिप प्रकरणावरून आधीच विरोधकांनी गायकवाड यांना लक्ष्य केले असताना, आता ‘वंचित’च्या या आक्रमक पवित्र्यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महापुरुषांच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, आगामी काळात हे ‘राजकीय युद्ध’ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!