सत्कार’ बाजूला, आधी ‘कायदा’ पाळा! ठाणेदार संग्राम पाटलांचा बुलढाण्यात ‘फायर’ अवतार
नेत्यांच्या शिफारसींना केराची टोपली; सत्कार करणार्या नगरसेवकांनाच दाखविला बाहेरचा रस्ता

’लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते, पण बुलढाणा शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. “सत्कार स्वीकारायला वेळ आहे, पण कायदा मोडणाऱ्यांची गय करायला नाही,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी वशिलेबाजी करणाऱ्या स्थानिक नेत्यांचे पाणी मोजले आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांनी तासाभरापूर्वी शॉल-बुके देऊन साहेबांचे स्वागत केले, त्यांनाच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणं ठाणेदारांच्या संतापाला सामोरे जावे लागले.
बुलढाणा शहरातील कर्णकर्कश बुलेट आणि बेशिस्त वाहनांविरुद्ध पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईदरम्यान एका नगरसेवक पतीचा भाचा पोलिसांच्या कचाट्यात सापडला. तीन दिवसांपूर्वीच सत्कार करणाऱ्या या नेत्याने जेव्हा ‘भांजा है, छोड दो’ अशी विनंती केली, तेव्हा ठाणेदारांचा पारा चढला. “याच्यासाठी आला असाल तर निघा, मला असे धंदे सांगू नका,” अशा शब्दांत त्यांनी नेत्याला सुनावले.
हा प्रसंग ताजा असतानाच, अर्ध्या तासापूर्वीच सत्कार करून गेलेला दुसरा एक तरुण नगरसेवक आपल्या नातेवाईकाची गाडी सोडवण्यासाठी केबिनमध्ये शिरला.व ‘साहेब मेरा रिश्तेदार है बुलेट छोड़ दो म्हणाला’ यामुळे संतप्त झालेल्या संग्राम पाटील यांनी आपल्या रायटरला तात्काळ आदेश दिला की, “याची शॉल आणि बुके परत करा, यापुढे अशी कामे घेऊन माझ्याकडे यायचे नाही!”
पोलिस स्टेशनमध्ये घडलेला हा ‘रुद्रावतार’ पाहून उपस्थित कार्यकर्त्यांची पाचावर धारण बसली. वशिलेबाजीच्या जोरावर नियम मोडणाऱ्यांना हा मोठा दणका मानला जात आहे. ठाणेदारांच्या या आक्रमक भूमिकेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत असून, त्यांच्या या निर्भय कारवाईचे नागरिक स्वागत करत आहेत. सध्या तरी बुलढाणा पोलिसांचा हा अवतार पाहून ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉगची आठवण येतेय— “ठाणेदारांना फ्लॉवर समजलात का? फायर आहेत ते!”




