न्याय मिळत नसेल तर नगर परिषदेसमोरच ‘आत्मदहन’ करू! तीन दिवसांपासून सफाई कामगारांचे आमरण उपोषण, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: वैद्यकीय रजा संपवूनही कर्तव्यावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा नगर परिषद प्रशासनाविरोधात दोन सफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या या कर्मचाऱ्यांनी आता थेट ‘आत्मदहनाचा’ इशारा दिला आहे. “जर उपोषणाने न्याय मिळत नसेल, तर नगर परिषदेच्या आरोग्य विभागासमोर स्वतःला जाळून घेऊ,” अशा शब्दांत उपोषणकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
आतिष भगवान उर्फ मुन्ना बेंडवाल आणि नरेंद्र विमल बेंडवाल हे बुलढाणा नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही काळ वैद्यकीय रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी नियमानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कामावर रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र, अनेक महिने उलटूनही आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांना कर्तव्यावर घेतले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांचे वडील हे भाजपचे पदाधिकारी आहेत, तर नगर परिषदेत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे. केवळ राजकीय वैमनस्यातून आणि दबावापोटी मुख्याधिकारी गणेश पांडे व आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल आम्हाला कामावर रुजू करून घेत नसल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. १ मे ‘कामगार दिना’चे औचित्य साधून या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. कडक उन्हात दोन कर्मचारी न्यायासाठी बसले असतानाही जिल्हा प्रशासन किंवा नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप त्यांची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता मृत्यूचा मार्ग निवडण्याचा इशारा दिला आहे.आता या प्रकरणी जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात आणि या सफाई कामगारांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




