बुलडाण्यात सत्ताधारी शिवसेना पोलिसांविरोधात आक्रमक; कुवारे आणि किंनगे नामक पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत अवैध धंद्यांची ‘हप्ता वसुली’ चा गंभीर आरोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलडाणा: बुलडाणा शहर आणि जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसाय आणि पोलिसांची निष्क्रियता यावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आता थेट पोलीस यंत्रणेविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज गायकवाड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

​शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांवरच गंभीर आरोप केले आहेत. “जिल्ह्यात अवैध वाहतूक, जुगार आणि वरली मटक्याचे अड्डे सर्रास सुरू आहेत. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष केवळ हप्ता वसुलीकडेच आहे,” असा खळबळजनक आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही वसुली बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण कुवारे व सुनील किंनगे यांच्यामार्फत केली जात असल्याचा थेट उल्लेखही यावेळी करण्यात आला.

अकार्यक्षमतेमुळे ४० निष्पापांचा बळी

​शहरातील वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, रोज होणाऱ्या अपघातांमध्ये आतापर्यंत जवळपास ४० निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असा दावाही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

​​सत्ताधारी पक्षानेच आपल्याच गृहविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात एवढी आक्रमक भूमिका घेतल्याने आता बुलडाणा जिल्ह्यात राजकीय आणि पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!