बुलढाणा जिल्हा पोलिसांची वर्ष २०२६ मध्ये उत्तुंग कामगिरी; एकूण १९.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त! ​पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात गुन्हेगारीवर वचक; ‘मिशन परिवर्तन’ ठरले मैलाचा दगड

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: भौगोलिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्या राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात वर्ष २०२६ मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात जिल्हा पोलीस दलाला मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा व खामगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी गुन्हे उकल, अवैध धंदे निर्मूलन, सायबर गुन्हे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध यामध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. वर्षभरात विविध कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त केला आहे.

​जिल्ह्यात वर्षभरात दाखल झालेल्या खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपैकी ७९% गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ४ कोटी ७ लाख ६१ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गेल्या २ ते ३ वर्षांपासून फरार असलेल्या ३८ सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अंमली पदार्थांविरोधात ‘मिशन परिवर्तन’

​युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन परिवर्तन’ ही अभिनव मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत गांजा व एम.डी. ड्रग्ज तस्करीच्या ५५ केसेस करून ५८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२४.८४६ किलो गांजा व अफू असा एकूण १ कोटी ९९ लाख ७८,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मोहिमेत केवळ कारवाई न करता पथनाट्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात आली.

गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई

​सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी म.पो.का. कलम ५५-५७ नुसार ८९ प्रस्ताव सादर केले गेले. अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत १३ प्रस्ताव सादर करून ५ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले. तसेच संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १११ अन्वये ४ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली.

अवैध धंदे, वाळू व गुटखा तस्करांना दणका

अवैध दारू व जुगार: मद्यबंदी कायद्यान्वये १९८१ केसेस करत २०२८ आरोपींकडून ६६.६२ लाख रुपयांचा, तर जुगार कायद्यान्वये ८४२ केसेसमध्ये १२१५ आरोपींकडून ४०.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रेती व गुटखा तस्करी: अवैध गौण खनिज (रेती) चोरीच्या ५३ केसेसमध्ये १०१ आरोपींना अटक करून वाहनांसह ५ कोटी ७८ लाख २४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर प्रतिबंधित गुटख्याच्या १२ केसेसमध्ये १४ आरोपींना अटक करून १ कोटी ८ लाख ३९,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आर्म्स ॲक्ट: शस्त्र बाळगणाऱ्यांवर १९ केसेस करून ४ पिस्तूल, ४ मॅग्झीन, १०० काडतुसे, चाकू, तलवारी व वाहनांसह ४५.९६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

मानवतावादी दृष्टिकोन: अपहरण व बेपत्ता व्यक्तींचा शोध

​जिल्ह्यात अपहरणाच्या ११० प्रकरणांचा छडा लावत ७९ मुली आणि १२ मुलांची (एकूण ९१ मुले) सुटका करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. तसेच बेपत्ता झालेल्या ७१८ व्यक्तींपैकी ३६६ महिला व १४६ पुरुष (एकूण ५१२ जण) पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे सुखरूप घरी परतले आहेत. नागरिकांचे हरवलेले २१७ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले.

सायबर पोलिसांची तत्परता; १७.२८ लाख नागरिकांना परत

​सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या सचिन विनायक जपे यांचे ८ लाख ५७,४७० रुपये सायबर सेलने परत मिळवून दिले. याशिवाय NCCRP पोर्टलच्या माध्यमातून इतर ११ तक्रारदारांचे ८ लाख ७०,६६८ रुपये, असा एकूण १७ लाख २८,१३८ रुपयांचा परतावा नागरिकांना मिळवून देण्यात आला.

वाहतूक शिस्त व न्यायालयीन यश

​मोटार वाहन कायद्यांतर्गत वर्षभरात ५५,९२९ केसेस करून ४ कोटी १४ लाख ४६,४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या ११२ केसेस करण्यात आल्या. पोलीस अंमलदार व कोर्ट पैरवीच्या उत्तम समन्वयामुळे JMFC कोर्टातील २१७२ केसेसमध्ये ६.६१ लाख रुपयांचा दंड, तर जिल्हा व सत्र न्यायालयात ९ केसेसमधील आरोपींना प्रत्यक्ष कठोर शिक्षा व ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

​”बुलढाणा जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. ‘मिशन परिवर्तन’ आणि कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावली असून, गुन्हेगारांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही.” — श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!