तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप लावणारा शेतकरीच निघाला भामटा; बनावट सातबारा प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) ट्रॅप घडवून आणणाऱ्या शेतकऱ्याचाच एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. बनावट सातबारा आणि पीकपेऱ्याचा एडिट फेरफार करून शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत जास्तीची ज्वारी विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जांब येथील एका शेतकऱ्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि कूटरचित दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​समाधान लक्ष्मण ताठे (रा. जांब, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.

​शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या वतीने बुलढाणा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीमार्फत ज्वारी खरेदी केंद्र चालवले जाते. सन २०२४-२५ या हंगामात ज्वारी विक्रीसाठी आरोपी समाधान ताठे याने ऑनलाईन नोंदणी केली होती. नोंदणीदरम्यान मौजे जांब येथील गट क्र. २१५ मधील मूळ पीकपेरा क्षेत्र अवघे ०.६४ हेक्टर असताना, त्याने सातबाऱ्यात एडिट (बदल) करून ४.६४ हेक्टर एवढे पीकपेरा क्षेत्र दर्शवणारा बनावट आणि फेरफार केलेला सातबारा ऑनलाईन सादर केला. या बनावट सातबाऱ्याच्या आधारे त्याने खरेदी केंद्रावर तब्बल ४१ क्विंटल ज्वारीची विक्री केली.​दरम्यान, या गैरप्रकाराबाबत तक्रारदार प्रदीप दगडू पवार व भारत नामदेव शेळके यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर झालेल्या सखोल चौकशीत मूळ सातबारा आणि ऑनलाईन सादर केलेला सातबारा यामध्ये मोठा फरक असल्याचे निष्पन्न झाले.

​आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासन व खरेदी-विक्री संस्थेची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यानंतर, बुलढाणा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे प्रभारी व्यवस्थापक संदीप भीमराव कांबळे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दिली.​संदीप कांबळे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी समाधान ताठे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम करीत आहेत.

-तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर आरोपी समाधान ताठे याने लावला होता ACB चा ट्रॅप-

विशेष म्हणजे, याच आरोपी समाधान ताठे याने शासकीय हमी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या बिलाची रक्कम अदा करण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करत तत्कालीन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांच्यावर एसीबीचा ट्रॅप लावला होता. २५ हजार रुपयांचा पहिल्या हप्त्यासाठी हा ट्रॅप करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धान्यासाठी केवळ साठवणूक, गोडाऊन आणि बारदाना उपलब्ध करण्याची जबाबदारी पुरवठा विभागाकडे असते, तर बिलाची रक्कम पणन महासंघाकडून अदा केली जाते. आता लाच मागितल्याची तक्रार करणारा शेतकरीच स्वतः बनावट सातबारा प्रकरणात अडकल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!