बुलडाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव द्या; प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन जनभावनेचा आदर करण्याची विनंती केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महान मातेच्या नावाने हे ‘आरोग्य मंदिर’ (वैद्यकीय महाविद्यालय) उभे राहणे, हा केवळ जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव ठरेल, असे प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
‘राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’
केंद्रीय मंत्र्यांनी पत्राद्वारे सुचवले आहे की, या महाविद्यालयाचे नामकरण ‘राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे करण्यात यावे. यामुळे भावी वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि जिल्हावासीयांना जिजाऊ माँसाहेबांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळत राहील.
“राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या या जिल्ह्यात त्यांच्या नावाने आरोग्य संस्था असणे ही काळाची गरज आणि जनभावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
— प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री.
या मागणीमुळे आता बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.




