गॅस दरवाढीचा चुल पेटवून निषेध! बुलढाणा काँग्रेसने पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविल्या ‘चुलीवरच्या भाकरी’

बुलढाणा: “केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे,” असा घणाघात करत बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीचा अनोखा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘चुलीवरच्या भाकरी’ पाठवून दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “महागाई कमी करा, अन्यथा खुर्ची खाली करा,” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
निवेदनात नमूद केल्यानुसार, काँग्रेसच्या कार्यकाळात ४००-४५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आज ९०० ते ११०० रुपयांवर पोहोचला आहे. या प्रचंड दरवाढीमुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. गॅस परवडत नसल्याने गृहिणींना पुन्हा लाकूड आणि पारंपारिक चुलीचा आधार घ्यावा लागत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या:
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तात्काळ कपात करावी.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात गॅस उपलब्ध करून द्यावा.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गॅसवर वाढीव अनुदान द्यावे.
जर शासनाने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर बुलढाणा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात संदीप शेळके (शहर अध्यक्ष), दत्ता काकस, विश्वदिय पडोळ (प्रदेश सचिव, युवक काँग्रेस), चित्रांगण तुकाराम खपरे, विठ्ठल चव्हाण, अभय मोरे, दीपक रिंढे, जाकीर कुरेशी, शेख मुजाहिद, पुरुषोत्तम मोरे, आरती सांबरे, राजेश जाधव, वसीम शेख अनवर, गजानन शेळके, बबलू कुरेशी, अमीन टेलर, विनोद गवई, कोता चव्हाण, विजय मोरे, भरत ठेग, विशाल सावळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




