चिखलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ? आ. संजय गायकवाड राहुल बोंद्रेंच्या भेटीला; ‘त्या’ गुपित चर्चेने महायुतीत अस्वस्थता!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ असे म्हटले जाते. बुलढाणा जिल्ह्यात सध्या अशाच एका नव्या समीकरणाची नांदी पाहायला मिळत आहे. बुलढाण्याचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी चिखली येथे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा आ. गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यात ‘सोशल वॉर’ शिगेला पोहोचले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आपली पकड मजबूत केल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी आता आपला मोर्चा चिखलीकडे वळवला आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या मतदारसंघात गायकवाडांनी शिवसेनेचे (शिंदे गट) संघटन वाढवण्याचा धडाका लावला आहे. यामुळे आ. श्वेता महाले आणि आ. गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जहाल फैरी झाडल्या जात आहेत. या वादात आता राहुल बोंद्रे यांची एंट्री झाल्याने राजकीय गणितं बदलण्याची चिन्हे आहेत.
बोंद्रे यांच्या ‘शिवसेना’ प्रवेशाच्या चर्चांना उधाण
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे हे गेल्या काही काळापासून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. त्यातच आ. गायकवाड यांनी त्यांच्या घरी जाऊन केलेली ‘सकारात्मक’ चर्चा ही या प्रवेशाची अधिकृत पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, चिखलीत भाजपला शह देण्यासाठी आखलेली एक मोठी रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या भेटीमुळे चिखलीच्या राजकारणात नेमकी कोणती ‘खिचडी’ शिजतेय, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच; पण या एका भेटीने विरोधकांसह मित्रपक्षाचीही झोप उडवली आहे, हे मात्र नक्की!




