अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई: गुटखा किंग निलेश राठींसह तिघांवर बोरखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;मकोका’ नुसार करवाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची मागणी; साडेचार लाखांच्या गुटख्यासह कार जप्त!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेला सुगंधी गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक आणि साठा करणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. मोताळा तालुक्यातील वाघजाळ येथे करण्यात आलेल्या या कारवाईत ४,४५,२०० रुपयांचा सुगंधी गुटखा आणि एक मारुती सुझुकी कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुटखा किंग निलेश राठींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संघटित गुन्हेगारीच्या (मकोका) दृष्टिकोनातूनही तपास करण्याची मागणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, २१ जून रोजी पहाटेच्या सुमारास वाघजाळ येथील राजेंद्र शिंबरे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या मारुती सुझुकी व्हीडीआय (वाहन क्र. MH १९ AP २७१५) कारची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधी गुटखा आणि पान मसाला आढळून आला. २१ जून रोजी पहाटे ४.५० ते सकाळी १०.१५ वाजेपर्यंत ही कारवाई चालली.
दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय २५) यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी १) योगेश गणेश गाडेकर (वय २८, रा. वाघजाळ, ता. मोताळा) – साठा व विक्री करणारा. २) आकाश गाडेकर (वय २५, रा. वाघजाळ, ता. मोताळा) – कार मालक. ३) निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) – कथित मुख्य पुरवठादार.या आरोपीं विरोधात नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३, २७४, २७५, १२३, आणि ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२), २७(३), ३(१) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील उत्पादक कंपन्या (M/S Vibrant Products, Valsad आणि M/S Nemi products, Valsad / Raisen M.P.) यांच्या मालक आणि संचालकांचाही या गुन्ह्यात शोध घेतला जात आहे.
-’मकोका’ (MCOCA) लावण्याची विनंती-
गुटख्याच्या पाकिटांवरील लेबल निरीक्षणावरून हा माल परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी साखळी पद्धतीने हा संघटित गुन्हा केला असल्याचा संशय आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून तपासाअंती आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी केली आहे.




