बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप
प्रसूतीवेळी बाळाच्या डोक्यात कैची घुसल्याचा दावा; पोलिसांत तक्रार दाखल

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात एका नवजात बालकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रसूती प्रक्रियेत बाळाच्या डोक्यात कैची घुसल्यानेच बाळाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाणे आणि रुग्णालय अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पद्माकर कडुबा वानखेडे (रा. खैरखेड, ता. मोताळा) यांनी आपली पत्नी शुभानी वानखेडे यांना प्रसूतीसाठी २६ मार्च २०२६ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीसाठी वेळ असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. “नॉर्मल प्रसूती होत नसल्यास सिझरियन करा, असे आम्ही वारंवार सुचवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर २८ मार्च रोजी प्रसूती करण्यात आली, पण त्यात बाळाचा मृत्यू झाला,” हा मृत्यू बाळाच्या डोक्यात घुसल्याने झाला असा आरोप वडिलांनी केला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, प्रसूती करताना निष्काळजीपणा करण्यात आला असून, बाळाच्या डोक्यात कैची घुसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर, प्रसूती कक्षात नर्सने शुभानी वानखेडे यांना मारहाण केल्याचाही अत्यंत गंभीर आरोप नातेवाईकांनी तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण
या आरोपांवर ‘लोकप्रिय मराठी न्यूज’शी बोलताना स्त्री रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. भागवत भुसारी यांनी सांगितले की, “प्रसूती ही रुटीन पद्धतीनुसारच करण्यात आली. प्रसूतीदरम्यान बाळ अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी ‘व्हॅक्यूम’चा वापर करण्यात आला. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचा मृत्यू झालेला होता. बाळाच्या डोक्यात कैची लागलेली नाही.”
शवविच्छेदनानंतर सत्य येणार समोर
बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट करण्यासाठी बाळाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात येणार आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणातील तांत्रिक सत्य आणि नेमका मृत्यूचे कारण समोर येईल. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.




