काटी गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ;तीन घरांवर दरोडा; दोन ठिकाणी चोरी, प्रतिकार करणाऱ्या ग्रामस्थाची निर्घृण हत्या; मलकापूर तालुक्यातील थरारक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला.

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

मलकापूर: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील काटी गावात आज रविवारी ८ ऑगस्टच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दहशत माजवली. एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य करत दरोडेखोरांनी दोन घरांत चोरी केली, तर प्रतिकार करणाऱ्या एका धाडसी ग्रामस्थाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. रायसिंग सीताराम सोळंके असे मृत ग्रामस्थाचे नाव आहे. या घटनेमुळे काटी गाव व परिसरात प्रचंड घबराट पसरली असून ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी सर्वात आधी बाळू हरिचंद्र भोगे यांच्या घरात घुसून सोन्याचे दागिने लांबवले. त्यानंतर संजय रामभाऊ हिवाळे यांच्या घरावर दरोडा टाकून साड्या व इतर साहित्य चोरले. यानंतर दरोडेखोरांनी गणेश मानसिंग राठोड यांच्या घराकडे मोर्चा वळवला.

​याच वेळी शेजारी राहणाऱ्या रायसिंग सोळंके यांना संशयास्पद हालचाल जाणवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोळंके यांनी हातात काठी घेऊन दरोडेखोरांना रोखण्याचा व पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवत पोटात तीव्र वार केले. गंभीर जखमी झालेल्या सोळंके यांना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

-​घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव; पोलिसांसमोर मोठे आव्हान-

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहान माचरे, मलकापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक सतीश महले, शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी आणि सोनाळा पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

​तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना (फिंगरप्रिंट एक्स्पर्ट) पाचारण करण्यात आले आहे. दरोडेखोर स्थानिक आहेत की बाहेरच्या टोळीचे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

​मध्यरात्री गावात घुसून दरोडा टाकणे आणि विरोध करणाऱ्याचा थेट खून करणे, यामुळे दरोडेखोरांची वाढलेली हिंमत स्पष्ट दिसत आहे. या भयानक घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी काटी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!