गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा! नराधम शिक्षकाकडून चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; संतप्त ग्रामस्थांनी फोडला चोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
मेहकर: शिक्षण क्षेत्राला आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे बुधवारी, ८ एप्रिल रोजी उघडकीस आली. जिल्हा परिषद शाळेतील एका ५८ वर्षीय नराधम शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला असून, संतप्त ग्रामस्थांनी या विकृत शिक्षकाला शाळेतच चांगलाच चोप दिला.
लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) हा शिक्षक कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानतोडे हा गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तीन चिमुकल्या मुलींसोबत अश्लील कृत्य करत होता. इतकेच नव्हे तर, या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही तो द्यायचा. या भीतीमुळे मुलींनी सुरुवातीला काही सांगितले नाही. मात्र, बुधवारी सकाळी या विकृताने मुलींचे कपडे उतरवून त्यांच्याशी लैंगिक चाळे केले. हा प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलींनी आपल्या पालकांना सर्व हकिकत सांगितली.
ग्रामस्थांचा संताप आणि धुलाई
हा प्रकार समजताच पालकांचा आणि ग्रामस्थांचा संयम सुटला. सकाळी १० वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने शाळा गाठली आणि या नराधम शिक्षकाला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. यामुळे काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि राखीव पोलीस दलाची तुकडीही पाचारण करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी पालकांची आणि ग्रामस्थांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी शिक्षक महादेव मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर कृत्य, सर्वत्र चीड
विशेष म्हणजे, आरोपी शिक्षक मानतोडे हा येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होता. आयुष्याच्या उत्तरार्धात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही या विकृत शिक्षकाने चिमुकल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी लोणी गवळी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




