सफाई कामगारांच्या वारसांना १० दिवसांत नियुक्ती मिळणार; राज्यमंत्री शेरसिंग डांगोर यांचे बुलढाण्यात आश्वासन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील आस्थापनेवर गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘लाड पागे समिती’च्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुककसिग डांगोर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, येत्या १० दिवसांच्या आत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले आहे.
दोन संघटनांची एकजूट: महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटना आणि महाराष्ट्र मेहतर सफाई कामगार संघटना (शाखा बुलढाणा) या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या प्रश्नावर लढा पुकारला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून हा पाठपुरावा सुरू होता.
आज दि. ८ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुककसिग डांगोर बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, दोन्ही संघटनांच्या वतीने त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय दिरंगाईमुळे वारसा हक्काचे प्रस्ताव सहा वर्षांपासून धुळखात पडले असल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. निवेदनाची दखल घेत डांगोर यांनी तात्काळ संबंधित विभागाला सूचना देऊन १० दिवसांत नियुक्त्या देण्याचे शब्द दिले.
निवेदन देताना संघटनेचे प्रधान कार्याध्यक्ष हाजी लतीफ शेख, विदर्भ अध्यक्ष सलीम शेख चाचा (शिवसेना शिंदे गट), महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा शेख भाई, जिल्हाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा सचिव रईस शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर शेख, कार्याध्यक्ष नसीर पटेल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इरफान शेख गणी, अरबाज शेख, नसीर आणि संघटनेचे इतर वरिष्ठ व कनिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सफाई कामगारांच्या मुलाबाळांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.




