पालकांची व शासनाची अनुदानासाठी फसवणूक; बुलढाण्यातील माऊंट सनाई इंग्लिश स्कुल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी!

इंग्रजी माध्यमात प्रवेश देऊन विद्यार्थ्यांचे नाव चढवले १००% अनुदानित मराठी शाळेत! ​शासकीय अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; पालकांचा शिक्षणाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार अर्ज.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क 

बुलढाणा: इंग्रजी माध्यमाच्या नावाने हजारो रुपयांची फी वसूल करायची आणि शासनाचे अनुदान लाटण्यासाठी पालकांना अंधारात ठेवून विद्यार्थ्यांचे प्रवेश चक्क १००% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचे, असा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आला आहे. मिर्झा नगर येथील माऊंट सनाई इंग्लिश स्कुल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा यांच्या संचालक मंडळाने, मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करून पालक आणि शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करत पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

​जोहर नगर, बुलढाणा येथील रहिवासी मो. अन्सार शे. अनवर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी आपल्या मुलीचा (रेहनुमा परवीन) यांचा प्रवेश ४ वर्षांपूर्वी मिर्झा नगर येथील ‘माऊंट सनाई इंग्लिश स्कुल’ (युडाएस कोड: २७०४००८७७६२) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता १ ल्या वर्गापासून चौथ्या वर्गात प्रवेश केला होता. प्रत्येक वर्ष शाळेने ठरवून दिलेली फी, गणवेश, पुस्तके खरेदी करून मुलीला इंग्रजी माध्यमातच शिकवण्यात आले व तसाच निकालही देण्यात आला.​परंतु, काही कारणास्तव जेव्हा त्यांनी मुलीला शाळेतून काढले आणि शाळा सोडल्याचा दाखला (TC) घेतला, तेव्हा या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. टीसीवरील स्टुडंट आयडी (२०२३२७०४०१०८७६२००३२) बाबत त्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता, माऊंट सनाई इंग्लिश स्कुलच्या युडाएस कोडवर या आयडीची कोणतीही नोंद आढळली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीचा ‘पेन नंबर’ (PEN No. २२५९९६९२७१५) तपासला असता, तिचा प्रवेश पालकांच्या संमतीशिवाय १००% अनुदानित असलेल्या ‘जनाबाई मराठी प्राथमिक शाळा, बुलढाणा’ (युडाएस कोड: २७०४०१०८७७२) या शाळेत दाखवण्यात आल्याचे समोर आले. ​हा प्रकार केवळ एका विद्यार्थिनीपुरता मर्यादित नसून, इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांना अंधारात ठेवून केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी ‘जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत’ दाखवण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, शिवाय शासनाच्या तिजोरीवरही दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तक्रारदाराने अशा शेकडो  संशयास्पद विद्यार्थ्यांची ‘पेन नंबर’सह यादीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.

-​इतर पालकांकडूनही तक्रारींचा ओघ सुरू-

​या घोटाळ्याची भणक लागताच इतर पालकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. मोईन बेग अजीम बेग या दुसऱ्या एका पालकानेही यात उडी घेतली असून, त्यांचा मुलगा ‘माहीद बेग’ याला इंग्रजी माध्यमात शिकवले जात असताना त्याचा प्रवेशही (पेन नं. २२२४०२६४७०३) जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत दाखवून आपली फसवणूक केल्याची लेखी स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा देत कारवाईची मागणी केली आहे.

-​’ऑन कॅमेरा’ चौकशी आणि दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी-

​या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, दोन्ही शाळांचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची ‘ऑन कॅमेरा’ चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोन्ही शाळांची मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

​या तक्रारीच्या प्रतिलिपि राज्याचे शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक (पुणे), उपशिक्षणसंचालक (अमरावती), जिल्हाधिकारी (बुलढाणा), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. बुलढाणा) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांनाही पाठवण्यात आल्या असून, आता शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन यावर काय कडक कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!