बुलडाणा ग्रामीण पोलिसांच्या चातुर्यामुळे ‘तो’ खोटा रिपोर्ट देणारा मुलगाच निघाला खुनी; वडिलांचा खून करून मृतदेह जाळला; स्वतःच दिली होती मिसिंगची तक्रार!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलडाणा :दारूच्या नशेत झालेल्या घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह लाकडाच्या गंजीवर जाळल्याची धक्कादायक घटना हतेडी खुर्द येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलाने स्वतःच पोलिसांत वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. परंतु, बुलडाणा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे व तांत्रिक तपासामुळे या क्रूर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांतच पर्दाफाश झाला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी अनिकेत समाधान घायवट (वय २१, रा. हतेडी खुर्द, ता. जि. बुलडाणा) याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्याचे वडील समाधान पुंजाजी घायवट (वय ४४) हे ७ मे च्या रात्रीपासून घरातून कोठेतरी निघून गेले आहेत.

​प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक  निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काकडे यांनी तांत्रिक तपास, बँक खात्यांचे व्यवहार आणि परिसरातील CCTV फुटेजची कसून तपासणी केली. मात्र, समाधान घायवट हे गावाबाहेर गेल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय तक्रारदार मुलावरच बळावला.

-​विश्वास घेताच मुलाने दिली गुन्ह्याची कबुली-

​१७ मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी व पोहेकॉ गजानन काकडे यांनी हतेडी खुर्द येथे जाऊन संशयित मुलगा अनिकेत याची त्याच्या आईसमोरच कसून चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेताच त्याने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.

असा घडला थरार…

८ मे च्या पहाटे १ वाजेच्या सुमारास समाधान घायवट हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी मुलगा अनिकेतला पुन्हा दारू आणून देण्यास सांगितले. अनिकेतने नकार दिला असता, वडिलांनी रागाच्या भरात हातात काठी घेऊन त्याच्यावर धावून गेले. या झटापटीत अनिकेतने वडिलांच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारली. या जबर मारामुळे समाधान घायवट जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

-पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला-

​वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच अनिकेतने पुरावा नष्ट करण्याचे ठरवले. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून, त्याने मृतदेह शेताच्या पराड्यावर नेला आणि तेथे असलेल्या लाकडाच्या गंजीवर ठेवून पेटवून दिला. यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून त्याने पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता झाल्याचा बनाव रचला.

​-आरोपीला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी-

​याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी अनिकेत समाधान घायवट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३, २३८, २३९ आणि २१२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २१ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सपोनि शरद माळी करीत आहेत.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:

“घरगुती वाद टोकाला जाऊ नयेत यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा. तसेच आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद घटना किंवा माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!