बुलढाण्यात एटीएस अन् रायपूर पोलिसांची मोठी कारवाई;२ पिस्तूल, ९२ जिवंत काडतुसे आणि एक्सयुव्ही ५०० कार सह ३ आरोपी जेरबंद, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगून बुलढाणा जिल्ह्यातील अंत्रीकोळी येथे आलेल्या एका तरुणासह त्याच्या इतर दोन साथीदारांना अकोला एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) आणि रायपूर पोलिसांनी काल रात्री संयुक्त कारवाई करत रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेत तब्बल ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुख्य आरोपी आपल्या सासरच्या घरी म्हणजेच अंत्रीकोळी (ता. चिखली) येथे आला होता. त्याच्याकडे घातक शस्त्रे असल्याची पक्की माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल मध्यरात्री अंत्रीकोळी येथे पंचांसमक्ष आर्म्स ॲक्टनुसार छापा टाकण्यात आला असून १. शुभम सागर पवार (रा. कारला चौक, वर्धा) २. रुपेश मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. पाचोरा, जि. जळगाव) ३. रोहेल मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्याकडुन २ देशी बनावटीच्या पिस्तूल आणि ४ मॅगझीन ९२ जिवंत काडतुसे आणि २ वापरलेली काडतुसे १ लोखंडी चाकू,महिंद्रा XUV500 कार (क्रमांक: MH 20 DJ 8687), आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३, ५, ७, २५ भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) सह कलम १३५(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके, पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ शितोळे, ज्योती गलबले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक सागर कोरडे तसेच अकोला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे यशस्वी केली. या प्रकरणाचा पुढील तपास रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करत आहेत.




