बुलढाणा वनविभागाकडे गंभीर तक्रार: किन्होळा शिवारात वन्यप्राण्यांची अवैध शिकार व मांस विक्री; पोलीस पाटलावर गंभीर आरोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ​चिखली तालुक्यातील किन्होळा शिवारात वन्यप्राण्यांची अवैध शिकार करून त्यांच्या मांसाची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गावातीलच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस पाटलानेच आपल्या पदाचा गैरवापर करून हा शिकारीचा अड्डा चालवल्याचा गंभीर आरोप एका वन्यजीव प्रेमीने केला आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक, बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग यांच्याकडे पुराव्यांसह गंभीर लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, किन्होळा शिवारातील गट नं. ६१९ ला लागून असलेले शेतमालक आणि किन्होळा गावचे पोलीस पाटील नंदकिशोर आत्माराम बाहेकर हे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून स्वतः व आपल्या टोळीच्या माध्यमातून निष्पाप वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार करत आहेत. शिकार केल्यानंतर चोरट्या मार्गाने आपल्या शेतात या प्राण्यांच्या मांसाची विक्री करण्याचा व्यवसायच त्यांनी सुरू केला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

​मंगळवार, दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी ११:११ वाजेच्या सुमारास संशयास्पद हालचाली दिसल्याने तक्रारदार वसंता नामदेव जाधव (रा. किन्होळा) यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तेथे वन्यप्राण्याची शिकार होत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘जिओ-टॅगिंग’ फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून पुरावे गोळा केले. यावेळी आरोपींनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी तेथून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला.

​तक्रारदार वसंता जाधव हे स्वतः वन्यजीव प्रेमी असल्याने त्यांनी यापूर्वीही पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर यांना हा अवैध प्रकार थांबवण्याबाबत तोंडी समज दिली होती. मात्र, “जसा हरणाला कापतो, तसा तुला कापल्याशिवाय राहणार नाही,” अशा अत्यंत भयानक शब्दांत बाहेकर यांनी जाधव यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​या गंभीर प्रकारानंतर वसंता जाधव यांनी ३ जून २०२६ रोजी उपवनसंरक्षक, बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग यांच्याकडे पुराव्यांसह गंभीर लेखी तक्रार सादर केली असून, सोबत घटनेचे व्हिडिओ आणि जिओ-टॅगिंग फोटो पुराव्याखतर जोडले आहेत. “पोलीस पाटील पदाचा गैरवापर करून हा शिकारीचा गोरखधंदा सुरू आहे. जर वनविभागाने यावर तात्काळ ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ (Wildlife Protection Act 1972) अंतर्गत कडक कारवाई केली नाही, तर माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका असून, यातून मोठा रक्तपात घडू शकतो,” अशी भीती तक्रारदाराने अर्जात व्यक्त केली आहे.

​आता या संपूर्ण प्रकरणावर बुलढाणा वनविभाग आणि पोलीस प्रशासन सदर आरोपी पोलीस पाटलावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!