पोलिसांना ‘क्लीन चिट’ की दबावाखाली खुलासा? जळगाव जामोद हत्या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी करण्याची मागणी!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: तालुक्यातील राजुरा येथे घडलेल्या अज्ञात मुलीच्या हत्या प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि संशयास्पद वळण मिळाले आहे. पोलिसांनी मृत घोषित केलेली मुलगी जिवंत समोर आल्यानंतर, कारागृहातून सुटलेल्या वडील-मुलाने अचानक घेतलेली यू-टर्नची भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. “संतापाच्या भरात आम्ही हत्येचा आळ स्वतःवर घेतला,” असा दावा आरोपी वडिलांनी केला असला, तरी हा खुलासा पोलिसांना वाचवण्यासाठी आणि कोणाच्या तरी दबावाखाली तर केला गेला नाही ना? असा संशय आता बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी ‘SIT’ (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

​काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद जवळील राजुरा येथे एका अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दावा केला होता की, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार येथील बाप-लेकाने आपल्या मुलीची हत्या करून मृतदेह येथे आणून टाकला. पोलिसांनी वडील बापुराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना ताब्यात घेऊन ‘मर्डर मिस्ट्री’ सोडवल्याचा मोठा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी मृत दाखवलेली मुलगी अश्विनी कलमेकर काही दिवसांतच जिवंत समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

हत्येची कबुली देणारे अचानक फिरले!

​या गंभीर गोत्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करत एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अबुलकर, जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील आणि पीएसआय पंकज सपकाळे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली होती (सध्या पीएसआय पंकज सपकाळे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मिळत आहे) दरम्यान, कारागृहातून बाहेर आल्यानंतर वडील बापुराम कलमेकर यांनी माध्यमांसमोर एक अजब खुलासा केला. “आमची मुलगी घरून पळून गेली होती, याच रागाच्या आणि संतापाच्या भरात आम्ही त्या अज्ञात मुलीच्या खुनाचा आळ स्वतःच्या अंगावर घेतला,” असे बापुराम म्हणाले.

मुलाची भीती आणि चेहऱ्यावरील दबाव स्पष्ट!

​बापुराम कलमेकर यांच्या या खुलाशानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांचा दुसरा मुलगा संतोष कलमेकर याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयाची सुई येथेच अधिक गडद झाली. संतोषने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत, नीट न बोलता केवळ “बाबा जो बोल रहे है वही सही है…” एवढेच उत्तर दिले. संतोषच्या चेहऱ्यावरील भीती आणि बोलण्यातील संकोच पाहता, हा जबाब स्वतःहून दिला की पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.

आमदार रोहित पवार आज जळगाव जामोदमध्ये; राजकीय वातावरण तापणार!

​या संपूर्ण प्रकरणाची दखल आता राजकीय पातळीवरही घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आज जळगाव जामोद येथे येत आहेत. पोलिसांच्या या ढिसाळ आणि संशयास्पद कारभारामुळे खाकीची प्रतिमा कमालीची मलिन झाली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार या प्रकरणी कोणती आक्रमक भूमिका घेतात आणि काय मागण्या मांडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

-​’SIT’ चौकशीची तीव्र मागणी-

एका जिवंत मुलीला मृत दाखवून निष्पाप लोकांना जेलमध्ये डांबणे आणि नंतर अचानक आरोपींनी पोलिसांनाच अनुकूल ठरेल असा खुलासा करणे, यामागे मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजुरा येथील ती अज्ञात मृत मुलगी कोण होती? तिची हत्या कोणी केली? आणि कलमेकर कुटुंबावर कोणाचा दबाव आहे? या सर्व बाबींचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी लावावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!