चाणाक्षपणे युक्ती आखून बुलढाणा शहर पोलिसांनी आंबेडकर जयंती मिरवणुकीतील हत्याकांडातील मुख्य आरोपीसह साथीदार केले जेरबंद
राजूर घाटात सापळा रचून आरोपींच्या आवळल्या मुसक्या; पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला यश

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या थरारक हत्याकांडाने बुलढाणा शहर हादरले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू वसंत जाधव आणि त्याचा साथीदार आनंद काकफळे या दोघांना बुलढाणा शहर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे युक्ती आखून राजूर घाटात अटक केली आहे. शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
१४ एप्रिल रोजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू होती. मिरवणूक संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास जयस्वाल आईस्क्रीम दुकानाजवळ प्रभाग क्र. २ मधील रहिवासी पप्पू जाधव याच्यावर आरोपी सोनू जाधव याने चाकूने सपासप वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पप्पू जाधवचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि आरोपी सोनू जाधव आपल्या साथीदारांसह फरार झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. आरोपींना शोधण्यासाठी चार वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते.आरोपींच्या कुटुंबीयांसोबत पोलिसांच्या विशेष ‘युक्ती’मुळे आरोपींच्या संपर्काची माहिती मिळाली.
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुख्य आरोपी सोनू वसंत जाधव आणि आनंद काकफळे हे दोघेही एका वाहनाने राजूर घाटात आहेत. या माहितीवरून पोलिसांनी राजूर घाटात सापळा लावला आणि दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने परिश्रम घेतले. या अटकेमुळे प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




