बुलढाण्यात राजकीय भूकंप! आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदेंना तडीपार करा; वंचितच्या जिल्हाध्यक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
दोन्ही नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे जिल्ह्याची बदनामी; निलेश जाधव यांनी निवेदनाद्वारे केली मोठी मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील दोन बड्या नेत्यांमधील राजकीय वाद आता टोकाला पोहोचला असून, या वादात आता ‘वंचित बहुजन आघाडी’ने आक्रमक उडी घेतली आहे. आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील जाहीर आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही नेत्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६/५७ अन्वये तात्काळ तडीपारीची कारवाई करावी, अशी खळबळजनक मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच विजयराज शिंदे यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शिंदे हे त्यांच्या येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करतात आणि आपल्याकडे याचे पुरावे आहेत, असा दावा गायकवाड यांनी केला होता. या विधानामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मते, अशा वक्तव्यांमुळे त्या आश्रमशाळेतील आजी-माजी विद्यार्थिनींच्या चारित्र्याची नाहक बदनामी होत असून सामाजिक वातावरण गढूळ होत आहे.
जिल्ह्याची प्रतिमा डागाळली!
राजमाता माँ जिजाऊंचे माहेरघर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची ओळख ही वैचारिक आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक राजकारणापोटी सुरू असलेल्या ‘बॅटिंग’मुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दोन्ही नेत्यांना जिल्हाबंदी किंवा तडीपार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.




