मुस्लिम बहुल भागात शुक्रवारीच ‘बत्ती गुल’ का? महावितरणाच्या हेतूवर माजी न.पा. उपाध्यक्ष सै. जुनेद व काँग्रेसचे वसीम शेख अनवर यांचा गंभीर संशय!

नमाजच्या दिवशीच वीज खंडित करून अडवणूक, माजी उपाध्यक्ष सैय्यद जुनेद आणि काँग्रेसचे वसीम शेख अनवर यांचा आरोप

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी नमाजच्या दिवशीच जाणूनबुजून वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा खळबळजनक आरोप माजी न.पा.उपाध्यक्ष सैय्यद जुनेद आणि काँग्रेस कार्यकर्ते वसीम शेख अनवर यांनी केला आहे. पावसाळापूर्व कामांच्या नावाखाली केवळ मुस्लिम वस्त्यांमध्येच हा ‘अंधेर नगरी’चा कारभार का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​सध्या महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी प्रत्येक फीडरवर ४ ते ५ तास वीज खंडित केली जाते. मात्र, आज १७ एप्रिल रोजी शुक्रवारी टिपू सुलतान चौक, इकबाल नगर, जोहर नगर आणि मिर्झा नगर या मुस्लिम बहुल भागात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. शुक्रवारी मुस्लिमांसाठी पवित्र नमाजचा दिवस असतो, त्यासाठी सकाळपासून तयारी करावी लागते. २वाजेपर्यंत नमाज पठण केली जाते, अशा वेळी विजेची नितांत गरज असताना महावितरणने याच दिवसाची निवड केल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.

​”जर झाडांच्या फांद्याच छाटायच्या होत्या, तर आठवड्यातील इतर दिवस सोडून शुक्रवारच का निवडला गेला?” असा थेट प्रश्न सैय्यद जुनेद आणि वसीम शेख अनवर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. हा प्रकार योगायोग नसून जाणूनबुजून एका विशिष्ट समुदायाला त्रास देण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नमाजच्या वेळी वीज नसल्याने मशिदींमध्ये आणि घरांमध्ये पाण्याचा व इतर कामांचा मोठा खोळंबा झाला.

​महावितरणच्या या नियोजनाशून्य कारभारामुळे मुस्लिम बांधवांमध्ये संतापाची लाट आहे. सणासुदीच्या किंवा धार्मिक महत्त्वाच्या दिवशी तरी वीज कपात टाळता आली असती, मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. याप्रकरणी महावितरणने स्पष्टीकरण देऊन ही ‘पूर्वनियोजित’ कपात थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!