बुलढाण्यात एसटीच्या ‘भंगार’ बसमुळे संगम चौकात तासनतास वाहतूक कोंडी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आज बुलढाणा शहरवासियांना बसला. चिखली आगाराची एक एसटी बस शहरातील अत्यंत गजबजलेल्या संगम चौकात मधोमध नादुरुस्त झाल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
चिखली आगाराची ही बस वर्दळीच्या संगम चौकातून जात असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. बस चौकाच्या अगदी मध्यभागी अडकल्याने चारही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही वेळातच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाहतूक कोंडीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि होमगार्ड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रणरणत्या उन्हात ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बस बाजूला करण्यात आली आणि वाहतूक संथ गतीने पूर्वपदावर आली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात अनेक बसेस जुन्या आणि मोडकळीस आलेल्या आहेत. या ‘भंगार’ बसेस वारंवार रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. महामंडळ प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.




