धक्कादायक! शासनाचे अनुदान लाटण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवले मराठी माध्यमात बुलढाणा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीत सत्य उघड; माऊंट सनाई आणि जनाबाई प्राथमिक शाळेवर कारवाईची टांगती तलवार

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: शहरातील मिर्झा नगर येथील ‘माऊंट सनाई इंग्लिश स्कूल’चा एक खळबळजनक कारनामा समोर आला आहे. शासनाचे अनुदान लाटण्याच्या उद्देशाने, इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या चक्क ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांना कोणतीही कल्पना न देता ‘जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत’ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाण्याचे गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला असून, आता शिक्षण विभागाकडून या दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याबाबतची कारवाईची टांगती तलवार टांगत आहे.
-तक्रारकर्त्यांचा चौकशीवर आक्षेप-
दरम्यान, शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीवर तक्रारकर्ते मोहम्मद अन्सार यांनी असंतोष व्यक्त केला आहे. मागणीनुसार मुद्द्यानिहाय चौकशी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मोहम्मद अन्सार यांनी सांगितले की, “जनाबाई मराठी शाळेत प्रवेश दाखवलेले शेकडो विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाचेच आहेत. माझी स्वतःची मुलगीही इंग्रजी माध्यमात शिकत होती आणि मी तिची पूर्ण फी भरली आहे, तरीही माझ्या परवानगीशिवाय तिचे नाव मराठी शाळेत टाकले गेले. जर शिक्षण विभागाने सर्व पालकांचे बयाण घेतले असते, तर शाळांनी पालकांकडून घेतलेली अव्वाच्या सव्वा फी आणि मोठा घोटाळा समोर आला असता. मिर्झा नगर हा मुस्लिम बहुल भाग असून, तिथे मराठी शाळा आहे हे कोणालाच माहीत नाही; तिथल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना मराठीचा ब्र शब्दही माहीत नाही.”
इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पालकांकडून हजारो रुपयांची फी वसूल करायची आणि प्रत्यक्षात शासनाचे अनुदान लाटण्यासाठी याच विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांना अंधारात ठेवून १००% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचे, असा प्रकार या शाळांनी केल्याचा आरोप आहे. याविरोधात बुलढाणा शहरातील जोहर नगर येथील मोहम्मद अन्सार, रायपूर येथील मोहम्मद तहेसीन जावेद अहेमद सौदागर व अन्य तक्रारदारांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. शाळांचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी समितीने २१ मे २०२६ रोजी दोन्ही शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता पुढील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
माऊंट सिनाई इंग्लिश स्कूल: शाळेच्या जनरल रजिस्टरवर (दाखल खारीज) ६१ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत, परंतु यु-डायस (U-DISE) प्रणालीवर केवळ १९ विद्यार्थी दाखवले आहेत.
जनाबाई मराठी प्राथमिक शाळा: जनरल रजिस्टरवर अवघे ४६ विद्यार्थी असताना, यु-डायस प्रणालीवर चक्क १२७ विद्यार्थी दाखवून पटसंख्या फुगवण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची हेराफेरी: माऊंट सिनाई इंग्लिश स्कूलमधील ४२ विद्यार्थी प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमात शिकत असताना, यु-डायस प्रणालीवर मात्र ते जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत दाखवण्यात आले आहेत.
या गंभीर गैरप्रकारावर माऊंट सिनाई इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांनी “हे सर्व नजरचुकीने झाले” असा लेखी खुलासा केला आहे. मात्र, चौकशी समितीने हा खुलासा असमाधानकारक आणि संयुक्तिक नसल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. सद्यस्थितीत हे ४२ विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये दिसत असून, यु-डायसवर सुविधा उपलब्ध होताच त्यांना पुन्हा मूळ इंग्रजी शाळेत इम्पोर्ट केले जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आता शिक्षण विभाग दोषी शाळांवर काय कडक पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




