बुलढाणेंकरासाठी खुशखबर: येळगाव धरणात २४ इंचाने पाणी वाढले! संध्याकाळपर्यंत पाणीसाठा १ मीटरने वाढण्याची शक्यता; पाणीटंचाईचे संकट सुटण्याची आशा

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा : बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव जलाशयाच्या संदर्भात शहरासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोरड्या पडलेल्या येळगाव धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ताज्या माहितीनुसार, धरणात तब्बल २४ इंच (२ फूट) पाणीसाठा वाढला असून, आज संध्याकाळपर्यंत हा साठा १ मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चालू उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेला येळगाव जलाशय पूर्णपणे कोरडा पडला होता. त्यामुळे प्रशासनाला शहराची तहान भागवण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
बुलढाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण
”दोन दिवसांच्या पावसाने येळगाव धरणात २४ इंच पाणी वाढले असून संध्याकाळपर्यंत ही पातळी १ मीटरवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे शहरावरील जलसंकट काही अंशी कमी होण्यास मदत होईल.”
धरण क्षेत्रात आवक सुरू झाल्याची बातमी समजताच बुलढाणा शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा पाऊस असाच कायम राहिल्यास शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




