निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने हवेत; मुस्लिम परिसर विकासापासून कोसो दूर; त्रस्त नागरिकांचा नगर परिषदेवर धडक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा : मुस्लिम समाजाला निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने हवेत विरल्याने आणि प्रचंड दुरवस्था झाल्याने, बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील इकबाल नगर व मिर्झा नगर येथील संतप्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित नागरिक आणि युवकांनी आज गुरुवारी नगर परिषदेत धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या प्रभागात नवीन नळाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण न करताच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पाडून ते अर्धवट सोडून दिले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे, हे ओळखणे कठीण झाले आहे. या प्रभागात हाजी उस्मान डोंगरे उर्दू शाळा, मौलाना आझाद शाळा, गुलशने इब्राहीम शाळा यांसारख्या अनेक शाळा आहेत. तसेच सहकार विद्या मंदिर, सेंट जोसेफ आणि केम्ब्रिज स्कूलच्या बसेस याच मार्गावरून जातात. या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या सफाई केल्यानंतर आठ-आठ दिवस कचरा उचलला जात नसल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचा असा आरोप आहे की, ते नियमित घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरत असूनही त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. अल्पसंख्याक प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून येणारा विशेष निधी इतर प्रभागांत वळवून या भागावर अन्याय केला जात आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध आहे.
-करांवर बहिष्कार आणि आंदोलनाचा इशारा-
मुस्लिम परिसरात सुविधा मिळेपर्यंत नगर परिषदेला कोणताही कर भरणार नाही, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. तसेच रस्त्यांची कामे, खड्डे बुजवणे आणि स्वच्छतेची कारवाई पुढील ८ दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा इकबाल नगर व मिर्झा नगर परिसरातील नागरिकांकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर शेख बशीर शेख कालु, ॲड. शकील शेख,लतीफ शाह भिकन शाह,अब्दुल गफ्फार शेख,शेख अकबर शेख मिया,हाफिज शेख मुजीबुरहेमान,शेस रशीद शेख कालु,मोहम्मद शाकीर मोहम्मद शकील,शेख अब्दुल गनी शेख सुलतान,एफ. एम. काजी,वाय-पि सैयद,जावेद खान,गुफरान,शेख गुलाम दस्तगीर,शेख अजहर,शेख नाजीम,वसीम शेख (पत्रकार), अबुजर या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




