सिंघम स्टाईल कारवाई! पोलीस कर्मचारी फय्याज सौदागर यांची समयसूचकता अन् ठाणेदार भोस यांची फिल्डिंग; धाड नाक्यावर कार अडवून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून पशुपालकांची झोप उडवणाऱ्या बकरी चोरट्यांच्या टोळीचा धाड पोलिस आणि जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत थरारक पद्धतीने पर्दाफाश केला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून, नाशिक आणि मुंबईच्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने हुंडाई कारसह अटक केली. ११ मार्च रोजी भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे जिल्ह्यात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस कर्मचाऱ्याची समयसूचकता आणि थरारक पाठलाग
धाड येथील टिपू सुलतान चौकातून शेख सलीम यांची १२ हजार रुपये किमतीची बकरी अज्ञात चोरट्यांनी एका हुंडाई कारमध्ये (एमएच १५) कोंबली आणि पळ काढला. हा प्रकार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी फय्याज सौदागर यांनी पाहिला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या दुचाकीवरून या कारचा पाठलाग सुरू केला आणि तातडीने धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना माहिती दिली.
खाजगी अन् शासकीय वाहनांची ‘फिल्मी नाकाबंदी’
माहिती मिळताच ठाणेदार प्रताप भोस स्वतःच्या खाजगी वाहनाने, तर पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पथकाने (कृष्णा चव्हाण, रवींद्र बराटे, राजू माळी, चालक नितीन इंगळे) शासकीय वाहनाने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. एका बाजूला दुचाकीवरून फय्याज सौदागर आणि दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या गाड्या पाहून चोरट्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवत बुलढाणा येथील ‘दामिनी पथकाला’ धाड रोडवर तात्काळ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.अखेर, धाड नाक्यावर पोलिसांनी या संशयास्पद कारला सर्व बाजूंनी घेराव घालून अडवले. आलिशान हुंडाई कारची झडती घेतली असता आतमध्ये ४ बकऱ्या पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.
नाशिक अन् मुंबईचे सराईत गुन्हेगार जेरबंद
पोलिसांनी कारमधील शेख फिरोज शेख लियाकत (वय ४५, रा. सादिक नगर, वडाळा, नाशिक) आणि आरिफ अब्दुल शेख (वय ३२, रा. माहीम झोपडपट्टी, मुंबई) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्यांनी धाड, भोकरदन आणि सिल्लोड परिसरातून बकऱ्या चोरल्याची कबुली दिली.
मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
या प्रकरणी शेख सलीम यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी धाड येथून १० बकऱ्या चोरीला गेल्या होत्या, त्या चोरीचा छडा देखील या टोळीच्या अटकेमुळे लागण्याची शक्यता आहे.




