बदलीसाठी १ लाख २० हजारांची लाच घेताना अकोल्यात कनिष्ठ लिपिक रंगेहात; हिवताप अधिकाऱ्यासह दोघे बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: आरोग्य सेवकाची नियमित बदली करून देण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत लाच स्वीकारणारा कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी आणि लाचेस संमती देणारे प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय २७) हे जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते जिल्हा हिवताप अधिकारी बुलढाणा अंतर्गत चिखली येथे प्रतिनियुक्तीवर सेवा बजावत आहेत. चिखली येथे नियमित बदली होण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता व तसा प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. या बदली प्रस्तावाचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून नियमित बदली करून देण्याच्या मोबदल्यात प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार आणि कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी यांनी तक्रारदाराकडे १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा येथे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे २२ सप्टेंबर रोजी अकोला येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यात कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी याने १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच डॉ. अतुल शंकरवार यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवून ती रक्कम कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी याच्याकडे देण्यास सांगितल्याचेही स्पष्ट झाले.
पडताळणीनंतर बुलढाणा एसीबीच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी दुपारी अकोल्यात सापळा रचला. आरोग्य सेवा मंडळ कार्यालयाजवळ असलेल्या नामा चौधरी माध्यमिक विद्यालयाच्या गेटसमोर कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी याने पंचांसमक्ष १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. तर दुसरीकडे प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार यांना त्यांच्या कक्षातून ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी अकोला येथील रामदास पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपी लोकसेवकांच्या घरांची झडती घेण्याचे काम पथकाकडून सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे, पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्यासह अंमलदार प्रवीण बैरागी, दीपक जाधव, अमोल झिने, जगदीश पवार, शैलेश सोनवणे, रणजीत व्यवहारे, रतन गिरी, चालक शेटे व अर्शद शेख यांनी केली.
नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा (जिल्हा कारागृहाजवळ, बुलढाणा) येथे संपर्क साधावा.




