खामगाव हादरले! अवैध रेती माफियाचा तहसीलदारांना उडवण्याचा प्रयत्न
तहसीलदार सुनील पाटील यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग; महसूल प्रशासनात मोठी खळबळ

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
खामगाव :तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीने कळस गाठला असून, आता रेती माफियांचे धाडस थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत वाढले आहे. अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पकडण्यासाठी गेलेले खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांच्या अंगावर रेती माफियाने वाहन घालून त्यांना उडवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या थरारक घटनेनंतर तहसीलदारांनी सदर वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून ते जप्त केले असून, आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदुरा रोडवरील पारखेड परिसरातून अवैध रेतीची मोठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी तहसीलदार स्वतः खाजगी वाहनाने नॅशनल हायवेच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, त्यांना MH-28 BB-7314 क्रमांकाचे वाहन अवैध रेती घेऊन जाताना आढळले.
थरारक पाठलाग आणि जीवघेणा प्रयत्न
तहसीलदारांनी सदर वाहन थांबवण्याचा वारंवार इशारा केला, मात्र महसूल प्रशासनाला पाहताच चालकाने वाहनाचा वेग वाढवला. हायवेवर पळून जाण्याच्या नादात चालकाने थेट तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला चकमा देण्यासाठी चालकाने भरधाव वेगात हायवेवरून ‘यू-टर्न’ घेतला. मात्र, डगमगून न जाता तहसीलदारांनी या वाहनाचा थरारक पाठलाग सुरूच ठेवला आणि अखेर सिनेस्टाईल पद्धतीने सदर वाहन अडवून ते ताब्यात घेतले.
पोलीस कारवाई आणि महसूलचा दणका
या गंभीर प्रकारामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. स्वतः तहसीलदारांच्या जीवावर बेतल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. तहसीलदार सुनील पाटील यांनी स्वतः शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, संबंधित वाहन चालक आणि मालकाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.




