मोताळ्यात शासकीय खरेदीचा ‘जुनाच खेळ’! ब्लॅक लिस्टेड संचालकांच्या नातेवाईकांकडून मका खरेदी

जिल्हाधिकाऱ्यांची डोळ्यात धूळफेक; किसनराज अ‍ॅग्रोएकर्स कंपनीचा बेकायदेशीर ठराव 'लोकप्रिय मराठी न्यूज' कडे

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मोताळा: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने सुरू केलेल्या मका खरेदी केंद्रांमध्ये मोताळा येथे एक खळबळजनक प्रकार लोकप्रिय मराठी न्यूज समोर आणत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅक लिस्ट (काळ्या यादीत) टाकलेल्या खरेदी केंद्राच्या संचालकांच्या नातेवाईकांच्या नावे नवीन केंद्राचा ताबा मिळवून खरेदी सुरू केली आहे. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची दिशाभूल केली जात असून, पणन मंडळ यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीर ज्वारी खरेदी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी २१ खरेदी केंद्रांना दंड आकारून त्यांना ब्लॅक लिस्ट केले होते. यामध्ये मोताळा येथील संत गजानन फार्मर प्रोड्युसर कंपनीचाही समावेश होता. या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना यंदा मका खरेदीची परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, मका खरेदीचे अधिकार चक्क जुन्या ब्लॅक लिस्टेड असलेल्या संत गजानन कंपनीच्या संचालकाच्या नातेवाईकांना सोपवले आहेत.यंदा मका खरेदीची मान्यता मिळालेल्या ‘किसनराज अ‍ॅग्रोएकर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी’ने एक अनोखी शक्कल लढवली. ​या कंपनीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संत गजानन कंपनीच्या संचालकाच्या नातेवाईकांना बेकायदेशीर नोटरी ठराव करून मका खरेदीचे अधिकार दिले आहे, म्हणजेच ‘खरेदी केंद्र नवीन, पण चालवणारे लोक तेच जुने’ असा हा प्रकार आहे.​​यामुळे “यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही.”

प्रशासनाची दिशाभूल लोकप्रिय मराठी न्यूजकडे पुरावे 

​हजारो क्विंटल मका खरेदी करून जिल्हा प्रशासनाची फसवणूक करण्याचा हा प्रकार ‘लोकप्रिय मराठी न्यूज’च्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांवर या केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यांना या प्रकाराची पुसटशीही कल्पना नसावी, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार?

​केवळ नावापुरती नवीन कंपनी समोर करून, पडद्यामागून ब्लॅक लिस्टेड लोकच? कारभार पाहत असल्याने सरकारी नियमांचा पुरता बोजवारा उडाला आहे. आता या गंभीर प्रकरणावर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!