विद्यार्थ्यांमध्ये कृषी उद्योजकतेला चालना देण्यासाठी बुलढाण्यात विदर्भ स्तरीय प्रथम ‘ॲग्रिव्हिजन गोलमेज परिषद’

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील उद्योजकतेची भावना विकसित करणे, नव्या संधींची ओळख करून देणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्याच्या उद्देशाने बुलढाण्यात विदर्भ स्तरीय प्रथम ‘ॲग्रिव्हिजन गोलमेज परिषद’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी ‘राजेंद्र गोडे कॉलेज, बुलढाणा’ येथे पार पडणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर एकूण सात मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये,कुक्कुटपालन,गांडूळखत निर्मिती,मशरूम उत्पादन,भूदृश्य रचना, रोपवाटिका व्यवस्थापन,-रेशीम उद्योग, मधमाशीपालन या सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक संधी, आवश्यक तंत्रज्ञान आणि कौशल्यांची माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून न राहता कृषी प्रक्रिया उद्योग व नवीन संकल्पनांच्या आधारे स्वयंरोजगाराकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या परिषदेला इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी गोडे, ॲग्रिव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक मनीषजी फाटे आणि अभाविपचे प्रांत संघटन मंत्री मनोजजी साबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ॲग्रिव्हिजन प्रांत संयोजक नेहा मुरलीधर, अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वृषभ गोहणे, जिल्हा संयोजक व्यंकटेश जुनारे आणि प्रांत टोळी सदस्य सेजल भस्मे यांनी या परिषदेची सविस्तर माहिती दिली. कृषी क्षेत्रातील बदलत्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




