बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांची निवड!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: दीर्घकाळापासून लागून राहिलेल्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ‘होम टाऊन’ असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्ष निवडीकडे लागले होते. माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होत्या.

​संदीप शेळके यांच्या नावाची होती चर्चा

​काही महिन्यांपूर्वीच ‘उबाठा’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संदीप शेळके यांना या पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्या दृष्टीने शेळके यांनी जिल्ह्यात संपर्क दौराही केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अखेर स्थानिक राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांच्या खांद्यावर जिल्हा काँग्रेसची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला.

​आगामी निवडणुका आणि आव्हानांचा डोंगर

​सध्या बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षासमोर मोठे संघटनात्मक आव्हान आहे. विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांचा अपवाद वगळता, जिल्ह्यात काँग्रेसकडे एकही आमदार नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला ‘घाटावर आणि घाटाखाली’ आपले गतवैभव परत मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी आता नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यावर असणार आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ही प्रकाश पाटील यांच्यासाठी पहिली मोठी परीक्षा ठरणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आणण्यासाठी नवनियुक्त अध्यक्षांना ‘पायला भिंगरी लावून’ काम करावे लागणार आहे, यात शंका नाही.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!