नांदूरा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध रेतीची वाहतूक करणारी ५ टिप्पर जप्त, ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जिल्ह्यातील विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज (रेती) उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीला पूर्णत: लगाम घालण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नांदूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारी ५ टिप्पर जप्त केली आहेत. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथके तयार केली होती.

​दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्री, नांदूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम सावरगाव नेहू परिसरातून काही इसम टिप्परच्या साहाय्याने विनापरवाना रेतीची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व त्यांच्या पथकाने सावरगाव नेहू परिसरात रात्रीच्या सुमारास सापळा रचून नाकाबंदी केली.

​-५ आरोपी ताब्यात, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त-

​नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद ५ टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यात अवैधरित्या वाहतूक केली जाणारी रेती आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालील ५ आरोपींना ताब्यात घेतले:

१. योगेश विजय काळे (वय ३०, रा. बेलाड, ता. मलकापूर)

२. आकाश सुरेश कंडारकर (वय २६, रा. झोडगा, ता. मलकापूर)

३. शुभम माणिक इंगळे (वय २६, रा. धरणगाव, ता. मलकापूर)

४. लक्ष्मण धोंडू चव्हाण (वय ३०, रा. नेहरुनगर, ता. मोताळा)

५. प्रल्हाद सुपडा नरवाडे (वय ४२, रा. मेंढळी, ता. मोताळा)

​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

५ टिप्पर: किंमत रुपये ७५,००,०००/-

​१० ब्रास रेती: किंमत रुपये १,००,०००/-

​एकूण मुद्देमाल: रुपये ७६,००,०००/-

​नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल

​या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. पंकज सपकाळे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपी चालकांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदूरा येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) सह गौण खनिज कायदा कलम २१(१) (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदूरा पोलीस करीत आहेत.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव)  श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलढाणा)  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. पंकज सपकाळे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. अमोल शेजोळ, अजीज परसुवाले, मनोज खरडे आणि चापोकॉ. शिवानंद हेलगे यांच्या पथकाने केली.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!