उद्या बुलडाण्यात ‘जागतिक नेत्रदान दिना’निमित्त जनजागृती रॅली; सक्रिय सहभागाचे ‘भायजी’ यांचे आवाहन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ‘नेत्रदान हेच जीवनदान’ हा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी उद्या, १० जून २०२६ रोजी बुलडाणा शहरात एका भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड (राष्ट्रीय अंध कल्याण संघ) जिल्हा शाखा बुलडाणा, बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटी आणि विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीची वेळ आणि मार्ग
सुरुवात: सकाळी ठीक ९:०० वाजता, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संगम चौक, बुलडाणा.
सांगता: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड संस्थेचे कार्यालय, गांधी भवन, जयस्तंभ चौक, बुलडाणा.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. यामध्ये:
बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते,वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉ. वसंतराव चिंचोले,नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईडचे उपाध्यक्ष प्रा. श्री रामकृष्ण म्हस्के,विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले,सहाय्यक, समाज कल्याण आयुक्त मनोज मेरत,जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोले,नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड सदस्य दिलीप नागरिक आणि मांगीलाल बुरड याशिवाय, बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटीचे नेत्रतज्ञ, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईडचे सर्व सदस्य व कर्मचारी, तसेच वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार आहेत.
उपक्रमाचा मुख्य उद्देश
”कॉर्नियल अंधत्वामुळे (बाहुलीच्या आजारामुळे) अनेक रुग्णांना आयुष्यभर अंधारात चाचपडावे लागते. दृष्टी नसल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होतो. ही उणीव भरून काढून अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाशाची नवी किरणे आणणे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
नागरिकांना आवाहन
या रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि विशेषतः ज्यांनी यापूर्वीच नेत्रदानासाठी आपली संमती दिली आहे अशा सर्व ‘नेत्रदात्यांचे’ संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
बुलडाण्यातील सर्व बंधू-भगिनींनी या सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रॅली यशस्वी करावी, असे आवाहन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड, बुलडाणाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.




