बुलढाणा नगर पालिका प्रशासनाची ‘ढिम्म’ भूमिका; ठेकेदाराच्या पठाणी वसुलीला पालिकेचा छुपा पाठिंबा?
'लोकप्रिय मराठी न्यूज' कडून करण्यात आला बुलढाणा बाजारातील पठाणी वसुलीचा पर्दाफाश!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात परगावातून आलेल्या छोट्या व्यावसायिकांवर बैठक वसुलीच्या नावाखाली ठेकेदाराकडून उघडपणे दादागिरी आणि पठाणी वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमानुसार केवळ २० रुपयांची पावती देणे बंधनकारक असताना, शिक्का व स्वाक्षरी नसलेली पावती देऊन दुकानदारांकडून १०० ते २०० रुपयांची सक्तीची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही बुलढाणा नगर पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कोणताही जाब न विचारता कोणतीही कारवाई न करता चुप्पी साधल्याने, या पठाणी वसुलीच्या लुटीला पालिकेचा छुपा पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल आत्ता उपस्थित केला जात आहे.
काल रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्टेट बँकेच्या बाजूला खामगाव येथून चप्पल, सँडल व बूट विक्रीसाठी १७ ते १८ व्यावसायिक आले होते. ठेकेदाराच्या वसुली कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना कोणतीही सही किंवा शिक्का नसलेली २० रुपयांची पावती दिली आणि थेट १०० ते २०० रुपयांची मागणी केली. या वाढीव वसुलीला विरोध दर्शवला असता, ठेकेदार व ठेकेदाराच्या माणसांनी व्यावसायिकांच्या दुकानातील साहित्याची थेट फेकाफेक केली. “पैसे देत नसाल तर दुकाने लावू नका,” अशी उघड दमदाटी करण्यात आली, असा आरोप खामगाव येथील व्यावसायिक अनिल चव्हाण यांच्यासह इतर दुकानदारांनी केला आहे. या संपूर्ण दादागिरीचा व्हिडिओ देखील व्यावसायिकांनी तयार केला आहे.
बुलढाणा नगर पालिकेच्या मिळकत विभागाद्वारे १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी बैठक वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे: दैनिक बैठक वसुली: १० रुपये प्रति दुकान,ठेका रक्कम: १२ लाख १५ हजार ५६ रुपये,आठवडी बाजार वसुली: २० रुपये प्रति दुकान,ठेका रक्कम: १६ लाख ३९ हजार ३६६ रुपये असा आहे.
नियमांची पायमल्ली करून लहान दुकानदारांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार लोकप्रिय मराठी न्यूजने समोर आणल्या नंतरही आज सोमवारी दिवसभरात नगर पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कोणताही जाब विचारला नाही किंवा नोटीस बजावली नाही. पठाणी वसुली व दादागिरीचा प्रकार मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या समोर आल्यानंतरही ढिम्म असलेल्या बुलढाणा नगर पालिका प्रशासन हललेले नाही. गोरगरीब विक्रेत्यांचा छळ करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने या पठाणी वसुलीच्या लुटीला पालिकेचा छुपा पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल आत्ता उपस्थित केला जात आहे.




