बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या ‘ईद-स्नेह मिलन’ कार्यक्रमातून सामाजिक सलोख्याचे दर्शन
'पत्रकार संघाने जोपासला बंधुभाव'; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले गौरवौद्गार

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: सामाजिक एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा पवित्र रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ३० मार्च रोजी सायंकाळी स्थानिक पत्रकार भवन परिसरात ‘ईद-स्नेह मिलन’ कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील विविध धर्माच्या आणि क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाफिज मुजाहिद यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “आजचा काळ आव्हानांचा आहे. समाजात जातीय द्वेष पसरत असताना राष्ट्रासाठी सर्व समाज संघटित करण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे.” यावेळी हारून सर यांनी रमजान महिन्यातील रोजा (उपवास) आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले.
या स्नेह मिलन कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे आणि उपनिबंधक सागर पवार यांनी भेट देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी बोलताना जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. राजपूत यांच्या निवडीनंतर पत्रकार केवळ संघटित झाले नाहीत, तर महापुरुषांच्या जयंत्या आणि सणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रतिभेला उजाळा देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय साहित्यिक डॉ. गणेश गायकवाड यांनी आपल्या काव्यातून विश्वबंधुत्वाची भावना मांडली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी सादर केलेले सुश्राव्य गीत, ज्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. डॉ. वैशाली निकम, प्रा. डी. आर. माळी, मालतीताई शेळके, डी. एस. लहाने, डॉ. लताताई बाहेकर, मृणाल सावळे, स्मिता म्हसाये, ॲड. किरण राठोड आणि मो. सोफियान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केले, तर विभागीय संघटक रहेमत अली यांनी या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. उपस्थितांनी यावेळी पारंपरिक ‘शीरखुर्मा’चा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाहेबाज शाह, कदीर कुरेशी, मुजफ्फार शाह, शेख महेबूब, तोफीक शाह, अदनान खान तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी नितीन सिरसाट, कासीम शेख, वासिम शेख, शिवाजी मामनकर, अजय काकडे, अभिषेक वरपे आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




